लालबहादूर शास्त्री
![]() |
| लालबहादूर शास्त्री |
संपूर्ण नाव : लालबहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव
जन्मतारीख : २ ऑक्टोबर १९०४.
बालपण : उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे लालबहादूरांचा जन्म झाला. लालबहादूरांचे वडील शारदाप्रसाद व आई रामदुलारीदेवी. लालबहादूरांचे वडील हे एक प्राथमिक शाळेत शिक्षक होते. लालबहादूर लहान असतानाच त्यांच्या पित्याचे निधन झाले, त्यांची आई छोट्या बहादूरला घेऊन आपल्या माहेरी गेली. त्यांचे बालपण आजोळी गेले. लालबहादूर लहानपणापासूनच खूप हुशार होते.
शिक्षण : त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापूर येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी काशी विद्यापीठात प्रवेश घेतला. या राष्ट्रीय शिक्षण संस्थेत त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांत त्यांना 'शास्त्री' ही पदवी मिळाली. त्यानंतर लालबहादूर श्रीवास्तवचे ते लालबहादूर शास्त्री झाले व पुढे त्याच नावाने प्रसिद्धीस आले.
लहानपणापासूनच त्यांचे विचार उदात्त होते. गोरगरिबांविषयी कळकळ होती. लहानपणी ते फिरायला गेले असताना आंबे विकणारा एक म्हातारा मनुष्य घरी जायला उशीर होतोय म्हणून कमी पैशात सर्व आंबे देण्यास तयार झाला. म्हाताऱ्या आंबेवाल्याने सांगितलेले पैसे लालबहादूरांनी दिले; पण त्यांनी निम्मेच आंबे घेतले. बाकीचे आंबे का घेतले नाही, असे मामाने विचारल्यावर लालबहादूर म्हणाले. दुसऱ्याच्या मजबूरीचा आपण गैरफायदा घेऊ नये. लहानपणापासून अशा बीर विचाराचे लालबहादूर पुढे देशाबद्दलही आदर ठेवूनच वागले.
देशसेवा व समाजसेवा : तरुणपणी लालबहादूर यांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले. लाला लजपतराय यांच्या 'लोकसेवक समाज' या संस्थेचे ते सभासद झाले. लालबहादूर शास्त्री हे वक्तशीर होते. प्रत्येक काम करताना ते काम योग्य व वेळेतच पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे शास्त्रीजींनी अनेक वेळा आनंदाने तुरुंगवास भोगला. बाबू पुरुषोत्तम दास टंडन हे त्यांचे गुरू होत. त्यांच्याकडून देशसेवेचे व लोकसेवेचे धडे शास्त्रीजींनी घेतले.
विवाह : वयाच्या तेवीस चोविसाव्या वर्षी त्यांचा विवाह ललिता- देवींबरोबर झाला. दोघेही एकमेकांचा आदर करत, काळजी घेत असत.
मंत्रिमंडळात सहभाग : १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. १९५२ च्या निवडणुकीमध्ये लालबहादूर शास्त्री निवडून आले व त्यांनी लोकसभेत पदार्पण केले. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते प्रथम रेल्वेमंत्री झाले. त्यानंतर सन १९६१ मध्ये गृहखात्याचे मंत्री झाले.
सन १९६४ मध्ये नेहरूंचे सहाय्यक मंत्री बनले. पंडित नेहरूंच्या निधनानंतर भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून सर्वानुमते लालबहादूर शास्त्री यांची निवड करण्यात आली. शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. नंतर १९६५ मध्ये झालेल्या पाक आक्रमणाला चोख उत्तर देण्याचा निर्णय शास्त्रींचा होता.
शास्त्रीजींना देशाच्या जवान व जनतेचे पोट भरणाऱ्या किसानांचे महत्त्व अनमोल होते; म्हणूनच त्यांनी 'जय जवान ! जय किसान !!' ही घोषणा दिली होती. शास्त्रीजींचा हा मंत्र सर्वच भारतीयांनी मनापासून जपला व त्याचा आदर केला. त्यांच्या सहकार्यामुळे ते सर्वांचे आवडते व लाडके नेते झाले.
शास्त्रीजी सद्गुणी, विनयशील, स्वाभिमानी, नि:स्वार्थी, दूरदर्शी, धीरणी व उदार व्यक्तिमत्त्वाचे होते. देशभक्तीच्या कार्यामुळे लोकांना त्यांची 'मूर्ती लहान पण कीर्ती, महान' ही म्हण खरी वाटू लागली.
मृत्यू : १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान शांतता करार झाला. आणि करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच या देशभक्ताचे निधन झाले. एका महान देशभक्ताला देश पारखा झाला.
***

0 Comments