भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद संपुर्ण मराठी माहिती | Rajendra Prasad Full Information In Marathi

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद

   संपूर्ण नाव : राजेंद्रप्रसाद महादेव सहाय.

जन्मतारीख : ३ डिसेंबर १८८४.

बालपण : बिहारमधील सारन जिल्ह्यातील जीरादेई गावी राजेंद्रप्रसादांचा जन्म झाला. वडिलांचे नाव महादेव व आईचे नाव कामेश्वरीदेवी. राजेंद्रप्रसादांचे वडील महादेव हे विनामोबदला हौसेने वैद्यकी करणारे परोपकारी गृहस्थ होते. आयुर्वेद, युनानी वैद्यकशाखेचे ते जाणकार होते. त्यांना एक भाऊ व तीन बहिणी होत्या.

शिक्षण : राजेंद्रप्रसादांचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने एका मौलवी साहेबाकडे झाले. ते उर्दू व फारसी या भाषांमध्ये पारंगत झाले. १९०२ मध्ये कोलकता विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास होऊन २०,००० विद्यार्थ्यांमध्ये ते सर्वप्रथम आले. कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पदवीधर झाले. १९०६ मध्ये बी. ए., १९०८ मध्ये एम. ए., १९०९ मध्ये बी.एल्. (एल्. एल्.बी.) आणि १९१५ मध्ये एम्. एल्. झाले. विद्यापीठाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीचे यश संपादन केले.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान : प्राध्यापक म्हणून राजेंद्रप्रसादांनी काम केले. मुजफ्फरपूरमधील 'भूमिहार महाविद्यालय आणि कोलकता येथील सिटी कॉलेजमध्ये' विद्यादान केले. राजेंद्रप्रसादांना नामदार गोखले यांनी भारतसेवक समाजाचे सदस्यत्व स्वीकारण्याविषयी आवाहन केले; पण कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी वकिली करण्याचा निर्णय घेतला. राजेंद्रबाबूंनी १९१४ ते १६ या काळात कायद्याचे अध्यापनकार्य केले. पाटणा हायकोर्टात त्यांनी वकिली केली.

सामाजिक कार्य : १९०६ च्या कोलकता अधिवेशनात त्यांनी स्वयं- सेवकाचे कार्य केले. १९१७ मध्ये चंपारण्यातील मजुरांवरील अन्याया साठी महात्मा गांधींनी दिलेल्या लढ्यात राजेंद्रप्रसादांनी सक्रिय सहभाग घेतला. भारत देश पारतंत्र्य मुक्ती आंदोलनात सहभागी झाले होते. दलितांची सेवा, ग्रामोद्योग विकास, हिंदी राष्ट्रभाषा प्रसार, रोगराई निर्मूलन, निसर्गोपचार करून लोकसेवा केली. १९३४ मध्ये बिहारमध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा संपूर्ण देशाच्या कानाकोपन्यांतून आलेली मदत पीडितांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य त्यांनी केले. सदाकत आश्रम आणि त्यांच्या संघटनकौशल्यामुळे राजेंद्रबाबूंच्या प्रयत्नाला यश आले व बिहारची जनता पुन्हा नव्याने उभी राहिली.

राष्ट्रसेवा : लोकसेवेतून त्यांनी राष्ट्रसेवेचा मार्ग पत्करला व तीन वेळेला (१९३४, १९३६ आणि १९४७) काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास पत्करला.

राजकारणातील सहभाग : २६ जानेवारी १९५० ते १९६२ या १२ वर्षांच्या काळात भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला. राजेंद्रप्रसादांनी राष्ट्रपती भवनाचा आश्रम केला. स्वत:चे मानधन एकचतुर्थांशावर आणले. दरमहा दहा हजारांऐवजी अडीच हजारात भागवावयाचे ठरवले. राष्ट्रपती भवनासमोरील उद्यान सर्वांना खुले केले. तीनशे खोल्यांच्या राष्ट्रपतिभवनातील फक्त चार खोल्यांचा कक्ष स्वत:ला ठेवून उरलेला भाग कार्यालयीन सेवेसाठी वापरात आणला.

सद्गुण : राजेंद्रप्रसाद सरळमार्गी, कठोर व निग्रही होते. हिंदी भाषेचे अभ्यासक होते. साधुतुल्य चारित्र्याने ते सर्वांचे आवडते राष्ट्रपती झाले.

लेखन : 'गांधीजी की देन', 'गांधीजी के कदमों में', 'आत्मकथा' ही राजेंद्रप्रसादांची नावाजलेली हिंदी पुस्तके आहेत. 'सर्चलाईट' आणि 'देश' या इंग्रजी, हिंदी वृत्तपत्रांचे त्यांनी संपादनकार्य केले.

सन्मान : भारतमातेच्या संरक्षणनिधीसाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने दान केले. १९३७ अलाहाबाद विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ लॉज', १९४७ पाटणा विद्यापीठाकडून 'विद्यावाचस्पती व सागर विद्यापीठ, म्हैसूर व दिल्ली या विद्यापीठांकडून सर्वोच्च पदवी, १३ में १९६२ - 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने त्यांना भूषविण्यात आले.

मृत्यू : ११ मे १९६२ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे सोपविली. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी महान व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले.

Post a Comment

0 Comments