सरदार वल्लभभाई पटेल संपुर्ण माहीती मराठी | Sardar Vallabhbhai Patel Information

सरदार वल्लभभाई पटेल

sardar vallabhbhai patel information

    संपूर्ण नाव : वल्लभभाई जव्हेरभाई पटेल.

    जन्मतारीख : ३१ ऑक्टोबर १८७५

    बालपण : गुजरातमधील करमसद खेडेगावात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव जव्हेरभाई व आईचे नाव लाडबाई. लहानपणापासूनच वल्लभभाई दृढनिश्चयी होते. त्यांचे मन कणखर होते. खणखणीत आवाज व पोलादी व्यक्तिमत्त्व असणारे वल्लभभाई हुशार व दंगेखोर होते. लहानपणी त्यांच्या काखेत एक गाठ झाली. त्या वेळी औषधोपचार जास्त प्रमाणात नव्हते. त्यांना कोणीतरी ही गाठ लोखंडी सळई तापवून चटका देण्याचा उपाय सुचविला. न्हाव्याने सळई चांगली तापवली; परंतु डाग द्यायच्या वेळेला मात्र त्याचा हात थरथरू लागला; पण लहानग्या वल्लभने धिटाईने "तुम्हाला भीती वाटते ना ? द्या ती सळई माझ्या हातात !" असे म्हणून ती तापलेली सळई स्वतःच आपल्या गाठेवरून फिरवली.

    शिक्षण : शेतकरी कुटुंबात जन्मलेला वल्लभ हुशार होता. वल्लभचे शालेय शिक्षण नाडियाद येथे झाले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवून अहमदाबाद येथे वकिली चालू केली.

    जनसेवा : वल्लभभाईंची भेट म. गांधींशी झाली. गांधीजींच्या आचारविचार व देशप्रेमाने प्रेरित होऊन वल्लभभाईंनी देशबांधवांची सेवा करण्याचा निश्चय केला. 

    गुजरातमध्ये महापुरासारखी मोठी नैसर्गिक आपत्ती आली. अनेक कुटुंबे बेघर, निराधार झाली. वल्लभभाई देवदूतासारखे त्या लोकांच्या

मदतीला धावले. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जनतेपुढे झोळी

पसरली. जनतेनेही मदतीचा हात पुढे केला. जमा झालेला फंड, कपडे,

अन्न, औषधे व निवाऱ्याची साधने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली.

    स्वातंत्र्य लढ्यात सहभाग : इ. स. १९२८ मध्ये सरकारने शेतकरी वर्गावर शेतसारा बसवून तो २० टक्क्यांनी वाढविला. पीक नाही, पैसाही नाही, अशा स्थितीत शेतकरी साऱ्याचा पैसा भरणार कोठून ? इंग्रज सरकार शेतकऱ्यांकडून जुलमाने सारावसुली करू लागले. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी वल्लभभाई पुढे सरसावले. सर्व जाती-धर्माचे स्त्री-पुरुष सत्याग्रहात सामील झाले. सत्याग्रहाचा विजय झाला. सरकारला माघार घ्यावी लागली. या कामगिरीबद्दल गांधीजींनी वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी दिली. तेव्हापासून लोक त्यांना 'सरदार वल्लभभाई पटेल' म्हणू लागले.

    देशस्वातंत्र्यासाठी अनेक लढ्यांत त्यांनी गांधीजींसोबत सहभाग घेतला. त्यामुळे वल्लभभाईंना अनेक वेळा शिक्षाही भोगावी लागली.

    राजकीय जीवन : १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताने त्यांना उपपंतप्रधान पद दिले. त्यांनी गृहमंत्री पदही सांभाळले. संस्थान खात्याचे मंत्रीपद सांभाळत असताना अनेक ठिकाणी स्वतंत्र राज्य होते. काहीजण स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हते. सरदार पटेलांनी अनेकांचे मन वळवून एकाच सत्तेखाली आणले. पटेलांनी खंबीर धोरण स्वीकारले. सर्व संस्थाने खालसा करून ती भारतात विलीन केली. सर्वांना देशभक्तीच्या धाग्याने एकसंघ केले. भारताच्या एकसंघटनेत व ऐक्यात या पोलादी पुरुषाचा महत्त्वाचा वाटा आहे.

    मृत्यू : अशा या पोलादी पुरुषाची जीवनज्योत १५ डिसेंबर १९५० रोजी मावळली.

***

Post a Comment

0 Comments