मराठी कथा कलाकार | कथा | Marathi Story | Stories In Marathi

कलाकार

मराठी कथा कलाकार | Marathi Story | Stories In Marathi

    कोवळी सकाळ. सूर्याची सोनेरी किरणं घरं, पाना- फुलावर सोनं माखत होते. कोवळ्या उन्हामुळं अंगात साचलेला गारवा झडत होता. भल्या सकाळीच नदी तिरावर नदीच्या उबदार पाण्यात अंग चोळून डुबूक-डुबूक अंघोळ करत लहान-थोर सर्वजण सकाळला रंग भरत होते. त्यामुळं प्रत्येकाच्या मनात आनंदाचं भरतं आलं होतं.

    अशा कोलाहलात लहानग्या मुलांना झिडकारत परेगाबाईनं अंघोळ केली. उशीर झाल्यामुळं तनतनत घरी आली. पोलीस पाटील काकासाहेब कालच गावाला गेले होते. त्यामुळं तिला गावात वारीसाठी जायचं होतं. ती काकासाहेबाला लैय भ्येतीया. वारीचं नाव सांगून परेगी भिक मागतेय म्हणत. काका तिच्यावर भलतेच खवळतेत. त्यामुळं त्यांच्या माघारी तिला वारी करायची होती.

    काकाचा रूबाब लैय भारी. पांढरा शुभ्र कोसल्याचा फेटा, हातात मूठ वळलेली काठी. रस्त्यानं बूट घालून कर-कर चालले म्हणजे त्यांच्या समोर कोणतीच बाई येत नाही. दारू पिणाऱ्यासाठी तर आकाश-पाताळ एक झालं म्हणून समजा. मद्य पिणाऱ्याला झोडपण्याचा त्यांचा खाक्याच न्यारा हाय.

    परेगानं झोळी-परडी घेतली. सुनेला “हिंगं आता येते गं” म्हणाली नि झुरळासारखं तरातरा गावात गेली. अनवानी पायानं वारी करायची म्हणलं की तिच्या मनात फुलच उमलतेत. वारीची सुरवात नायकिनीच्या घरी जाऊन केली. "वारी वाढ गं माय" अंकिताबाईनं वारीची साद ऐकली, पटदिशी रात्रीचं शिळंपातं, पीठ-मीठ आणलं. लगेलगे परेगाच्या झोळीत घातलं. त्यावेळी अंकिताबाई म्हणाली,

    "परेगे लैय दिसानं आलीस ग वारीला !” “आवं काय सांगू

माल्कीन, काकासाब वारी मागू नकू म्हन्तेत वं"

    “आगं परेगे त्यांचं खरंय गं. त्वा शेतात राबावं काळ्या आईची पसाभर सेवा कर गं. ती तुला जलमभर खायला देईन."

    तेथून "व्हय" म्हणून निघाली. एका नंतर दुसऱ्या घरी अनवानी पायानं तिचं फेरी करत वारी मागणं सुरू होतं. गावात कोणीही काहीही म्हटलं तरी ती डोळ्यावर कातडं ओढतीया. हळूहळू तिची झोळी जड होत होती.

    घरोघरी वारी करत दुपार झाली. तिची प्रत्येक घरी वारी झाल्यामुळे ती घराकडं निघाली. तोच तिच्या उल्हासावर जणूकाही रपारपा पाणी पडलं! काकासाहेब तिच्या म्होरं उभे. टांग्यात बसून तालुक्याहून लगेलगे परतले होते. त्यांना पाहताच परेगीच्या काळजात धस्स झालं! तिला पाहताच काकासाहेबाचा तिळपापड झाला. भलतेच रागावले, “परेगे तू कशी गं? कितीदा सांगितलं तुला. आगं हे असलं काम सोड. दुसरं कोणतही काम कर. कष्टाचं खा. तुमाला आसेच कामं करायचे सांगितले का रं बाबासाहेब आंबेडकरानं? सगळा गाव जरी सुधारला तरी हिची चाल सुटणार नाही. आरं जग कुठं आपण कुठं अब्रुकडं बघा जरा" म्हणत कडाकडा बोलून वाड्याकडं गेले.

    थोर मनाची माणसं जणुकाही लाखात एक असतात. ते चाकोरीतली जात-पात न मानता माणुसकीच जात आणि कर्तव्य धर्म मानतात! काकासाहेबाच्या करणी आणि कथनीत मानवता खच्चून भरलीय!

    केरबाचा गंप्या आणि सदाबाचा सट भलतेच गावठी दारू प्यायचे आणि मग घरी दारी भांडणं करायला त्यांना भलताच ताव चढे. आश्रुबा 'भदाण्या बेरल भरभरून दारू काढायचा. रोज रोज दारू पोटात रिचवल्यामुळं दोघंजणं असे काही पोटदुखीनं बेजार झाले की, त्यांना नानी याद आली. दवाखान्यात जावं म्हटलं तर जवळ पैसे नाहीत. शेवटी काकासाहेबाला दया वाटली. त्यांनी मायंदळ पैसा खर्च केला नि त्यांन ठणठणीत करून भलतंच झोडपलं. तेव्हा पासून त्या दोघांनी दारू पिणे सोडलंय.

सगळा गाव व्यसनी, कसल्यातरी भानगडी करण्यात पटाईत. परंतु काकासाहेब पोलीस पाटील झाल्यापासून कोणीच असं भलतं- सलतं काम करीत नाहीत. गावातले कांही कामकटाळेपणा करणारे लोकं सोडले तर त्यांचं ऐकून सर्वजण गाडीला बैल जुंपल्यासारखं आपापल्या कामात गुंतलेत. परेगा घरी आली. तिचा काकासाहेबानं भलताच पानउतारा केला होता. त्यामुळं झोळीतले शिळे पाते कुटके तिला वंगळ दिसत होते. तिचा नवरा भीमराव तिला समजावत होता, "आगं त्यांचं खरयं गं. अशानं आपल्या रमणची इभ्रत कमी व्हईल. त्याचे शिनपाक पोरं त्याला नावं बी ठिवतेल. आगं माय-बापाची कर्तबगारी लेकराला हुरुप आणीत आस्तेय." लगेलगे तिनं वारीचे कुटके नदीत फेकून दिले.

    काकासाहेब म्हणजे जणूकाही फणसावानीच ! ते रागारागानं काही- बाही बोलतेत पण त्यांच्या मनात दयेचे खुमासदार गरं आहेत. त्यांनी परेगावर रागराग केला खरा, परंतु भीमरावला बोलावून शेतीसाठी मदतीचा हात दिला. त्यावेळी भीमरावच्या डोळ्याला एकदम धारा लागल्या.

    “पोरगं काय करतं रं तुझं!"

    डोळं पुसत भीमराव म्हणाला, “काकासाब रमण तालुक्याला चिताऱ्याच्या हाताखाली काम करतोय. लैय झकास चित्रं काढतोय. लहान फोटूहून हुबेहूब तसाच मोठा फोटू काढतोय बघा त्यो!”

    काकासाहेब मोठ्यानं हसले. "वा! कलाकार हाय म्हन की त्यों, आरं मंग आमचा फोटू काढ म्हणावं की त्याला. "

    "बरं! म्हन्तो त्याला. "

    "आरं ह्याच्या-त्याच्या हाताखाली काम करण्याऐवजी सवतं

दुकान टाक म्हणावं त्याला. पैसं मी देईन म्हणावं. "

    "काकासाब तुमचं आयकिल त्यो.” दोघं बराच वेळ बोलत होते. भीमराव घरी आला. लगेलगे रमणला काकासाहेबाचा चित्ररूप फोटो काढायला सांगितलं.

    रमणनं भलतेच वेगवेगळे चित्रं चितारले होते. दारिद्र्यात खितपत पडलेले उपासी पोटं! मेहनत करताना घामानं भिजलेला मजूर! सावकारानं लुटून नेलेलं शेत पाहत बसलेला असहाय कुनबी! हुंडा, अत्याचार, प्रदूषण, विषमता, निसर्ग! त्याच्या चित्रात सामाजिक जाणीव आणि विषमतच्यो विरुद्ध समतेची जणूकाही हाक होती!

    काकासाहेबानं म्हटल्यानुसार रमणनं त्यांचा हुबेहूब मोठा फोटू चितारला. चित्रामध्ये ते जणूकाही राजर्षि शाहू महाराजावानीच दिसत होते! आणि जेव्हा चौकातल्या मंदिरात त्यानं देव-देवतांचे फोटू रेखाटून रंगवले, तेव्हा मात्र सगळ्या गावानं त्याला डोक्यावर घेतलं. काकासाहेब तर भलतेच गदगदले! म्हणाले, "आरं रमणा, जिथं सर्वांची श्रद्धा ती त्वा हातानं चितारलीस! भल्या माणसा, त्या हाताला काम नसनं वाईटच. काय पाहिजेत ते दाम घे. आन् तालुक्याला चिताऱ्याचा धंदा सुरू कर. पैसे शिलकी पडले म्हंजी स्वाभिमानानं परत दे.

    काकासाहेबानं बऱ्याच गोरगरीबांना मायेनं आधार दिलाय. परश्या, नवा आणि काहीजण बिगारी कामासाठी शहरात गेले होते. काकासाहेबानं त्यांना गावाकडं आनलय. त्यांनाही मदतीचा हात दिला. त्यांच्या पडीत जमिनी होत्या. मात्र आता वहितीमुळं चांगल्या डवरल्यात. त्यांच्या रानात रोजच भाजीपाला टरारून येतोय. तालुक्याला नेऊन विकतात. त्यामुळं त्यांच्या हातात झऱ्याच्या पाण्यासारखे पैसं खुळखुळतेत. तरीही गावातल्या कामकटाळेपणा करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या जमिनी अजून पडीतच आहेत.

    एके दिवशी परेगा आपल्या सुनेला म्हणाली, "येऽऽ रमे, आयकिल स का, मला वाटतय आप्ल्या गावात मला वारी करता येईना, मुन म्हन्तेय, त्या गावाला जाऊन पैशाची वारी करू का गं?" असं ऐकताच रमा भलतीच खदागदा हसली. म्हणाली, "चला मग मी ही येते."

    "तू नकु माय. तुव्हा रमण लैय पैसे कमवायलाय. तच्यावर मही काय बी किंतू नाय. त्यानं आपल्या माय-बापाचा पांग फेडलाय गं."

    परेगाच्या घरी सुख दरवळत होतं. तरी ही तिची वारी करण्याची जुनी हौस फिटत नव्हती. म्हणून दसऱ्याच्या शुभदिनी घरातले सर्वजण, वस्तीतल्या आया-बाया सर्वजण नागपूरला दीक्षाभूमीवर बाबांच्या दर्शनासाठी त्यांच्या परम तत्तापुढं लीन होण्यासाठी निघून आले. विनयशील झाले. रमणच्या आई-वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले! त्या ठिकाणची वैभव पुण्यशीलता पाहून सर्वजन हरकले! त्यांचे पाणीदार डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. बुद्ध भगवंताच्या, बाबाच्या चरणी सर्वांनी माथा ठेवला. रमणनं त्याठिकाणी आपल्या हृदयात दीक्षाभूमीचं चित्र रेखाटलं होतं.

उज्ज्वल जीवनासाठी दीपदर्शी म्हणून!

    त्यावेळी रमा सासूला सहज म्हणाली,

    "आत्या, तुमी झोळी आणलीय का ?"

    "कशाला गं रमे?"

    "आवं मी म्हन्ते इथं वारी करा की."

    "चल हाट गं!" आता कशाची वारी न कारी. आता ते सगळ सोडते गं माय."

    परेगानं असं म्हणताच वस्तीतल्या तिच्या मैत्रिणी खदाखदा हसायला लागल्या. तर परेगा लाजेनं चूर-चूर झाली होती!

पुढे वाचा>>>

कथाकार - अशोक गायसमुद्रे

***

Post a Comment

0 Comments