स्वातंत्र्य दिन
पावसाळी सायंकाळ, काळ्याकुट्ट ढगांनी भरलेलं आभाळ ढगांच्या आपसातील टकरीमुळं गर्जू लागलं. विजांचा चमचमाट सुरू झाल्यामुळं वीज पडण्याचाही नेम नव्हता. वादळ वारं सुटल्यामुळं रानातले कामकरी गुरं- ढोरं कावरेबावरे होऊन गाडी रस्त्यानं तर कोणी पाऊलवाटेनं घराच्या ओढीनं धावत होते. शिवेवरच्या आया-बाया डोईवर सरपनाची, गवताची मोळी आणि कडेला चिमुकलं लेकरू घेऊन चालताना भलत्याच घायकुतीला आल्या होत्या!
वादळ वाऱ्यातले कामकरी गावाजवळ आले तशी टपोऱ्या पावसाची झिम्माड सुरू झाली. टपटप पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाना नि काळ्याकुट्ट ढगांना पाहून धोंडीबा घाबरून म्हणाला,
"आगा गाऽगा लैय आभाळ आलय. आता मातर खैर नाय, भलता-पाऊस रीचवतोय गड्या!” लगेच लहानग्या नातीला म्हणाला,
“रिंकेव तुह्या आजीला म्हणावं चिम्नीत घासलेट भरलंय का?” म्हणत समोरच्या झोपड्यात शिरला.
घरातून त्याची बायको तोंडातच पुटपुटली, “रिंकीच्या आज्याला काय घोर लागलाय गं माय ?" आणि लगेच मोठ्यानं भोंग्यासारखं ओरडत म्हणाली,
"भरलय व मालक, बसा गपचीप!" पाहता पाहता पावसाचा जोर वाढला. घरावरच्या पत्र्यावर कोसळणारे पावसाचे थेंब टचटचू लागले. पनाळ्यातून पावसाचं पाणी भरून वाहू लागल्यामुळं घरात आपसात बोललेलं देखील ऐकू येत नव्हतं. तरीही धीर धरून सर्वजण निर्भयपणे बसले होते.
चांगली झापड पडल्यामुळं घरात अंधार झाला तेव्हा येलाबाई आपल्या सुनेला म्हणाली,
आगं ये सुले, चिम्नी लाव इचुकाडा घरात शिरन!" सुली आगपेटी शोधू लागली. वळचणीवरच्या आगपेटीला हात लावताच म्हणाली,
"आवं आत्या, डब्डं भिजून चिंब झालय ! आन् पत्रावरल्या पाण्याचा लोंडा भिताडावरून लय वगळू लागलाय. "
येलाबाई लगेच धांदरून लगबगीनं पोराला म्हणाली, "आरं शिरपा, भिताडाच्या कडीला सर पाड. नायतर साऱ्या घरात पाणी व्हईन."
लगेलगे श्रीपतीनं कुदळ घेऊन भिंतीच्या कडेनं सरी खोदली आणि भिजतच झोपड्यात बसलेल्या वडीलाकडून चकमक आणली. विस्तवाची ठिनगी कापडी धांदीवर पाहून अग्नी पेटवून चिमनी लावली. त्या बरोबर घरात अंधुकसा उजेड पडला. घरातलं दृष्य पाहून सर्वजन थक्क झाले. सगळ्या घरात पावसाचं पाणी ओघळल्यामुळं भिंती चिंब भिजल्या होत्या आणि दाराजवळ भलतं पाणी साचलं होतं.
बाहेर पावसाचा जोर ओसरत नव्हता. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. श्रीपती आणि त्याची पत्नी घरात साचलेले पाणी वाटीनं भरभरून बाहेर फेकत होते! त्यामुळं कोरड्या जागेत ओल पसरत होती.
बऱ्याच वेळानं जोराचा पाऊस मंदावला. बारीक रिमझीम सुरू झाली. त्यावेळी बाहेरच्या झोपड्यात बसलेला धोंडीबा घरात आला. बिचारा पावसानं कपड्यासहीत चिंब झाला होता. त्याला पाहताच त्याची बायको येलावाई आक्रसून म्हणाली,
"ह्यो रिंकीचा आजा तर निव्वळ लनुश्या लेकरावानीच हा धनकुत येवुन पडला म्हंजी त्याला बराय हाय का याला गुंडाळायला दुसरं धोतर!” लगेलगे रागात म्हणाली, "नेसा वं मालक आता घोंगडी!"
आजीनं असं म्हणताच रिंकी मुरकुंडी वळेस्तोवर हसायला लागली. त्यावेळी त्याची मुलगी भलतीच कळवळली.
“पावसात घरात यायचं की रं बा, भिजुनशानी चिंब झालास." दोघा मायलेकराचं ऐकून धोंडीबानं झोपड्यात जाऊन घोंगडी गुंडाळली. अंगावरचे ओले कपडे पिळून वाळत टाकले.
धोंडीबानं पोटावरी साल घातलं. जमीनदार सावकारानं त्याच्या पोराचं लग्न करून दिलं. नेसायला एक धोतर, पायात जोडा, पांघरण्यासाठी घोंगडी दिली. एवढ्यावरच त्यो सावकाराच्या शेतात वर्षभर राबराब राबला.
रात्रीचा स्वयंपाक झाला. सर्वजण जेवणासाठी बसले. आठवड्यातून दोन-तीन दिवस जेवण्यासाठी त्यांना भाकरी सोबत भाजी नसतेच. त्यामुळं नेहमीसारखं सगळ्यांनी ताटात हिरव्या मिरच्याचा ठेसा घेतला.. त्यामध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकून मीठ पाण्याची भाजी तयार केली. सर्वजण अगदी आनंदानं बाजरीच्या भाकरीनं पोटाची आग शमवू लागले. जेवतावेळी येलाबाई म्हणाली,
"आपून आसं करू, घराला कुलूप टाकून चावडीत इसरांत्याला जाऊ, घराचा परवर तर वसाऱ्यानं भिजून गेलाय. आन् बाहीर झोपड्यात तर पाणीच पाणी झालंय."
लगेलगे तिची सून सुला म्हणाली, “तितं नगं व आत्या सांच्याला तितं कुत्रे, गाढवं बसत्यात. आन चावडीत गोचडं बी लैय झालेत म्हणं!"
मध्येच रिंकीनं री ओढली. “ये आजी, चावडीत डासं ही पुष्कळ आहेत गं." “आगं रिंकु, हातापायाला थोडं घासलेट लावलं म्हंजी चावरं चावत नस्तय!"
शेवटी तिची मुलगी रत्ना म्हणाली, "चावडीत नगं माय. लोकं हास्तेल आपल्याला. म्हन्तेल, धोंडीबाच्या घरचे आपलं घर सोडून चावडीत झोपायला गेलेत!”
"हे मातर खरं हा बग रत्ने." सगळ्यांचे जेवण आटोपले. निवाऱ्याचा प्रश्न सुटला होता. दिवसभर रानात सर्वजण राबराब राबल्यामुळे भलतेच थकले भागले होते. आपली इभ्रत राखत त्यांनी भिजलेल्या का होईना घरातच झोपण्याचं ठरवलं!
लगेलगे कागदासारख्या पातळ पत्र्याच्या घरात फाटके-तुटके, मळलेले घुम्मट वास येत असलेले गोधडे अंथरले. एवढ्या जनांना घरात झोपण्यासाठी जागा अपुरी होती, त्यामुळं धोंडीबा व त्याची पत्नी चुलीजवळ बसूनच जागरण करत रात्र काढण्याच्या तयारीत होते. घराची अडचण पाहून येलाबाई आपल्या नवऱ्याला म्हणत होती,
"आरं मताऱ्या, आपल्या सरपंचाला म्हणावं तुमच्याइतं फुकटसाल घालतो, मातर ह्या खेपेला सरकारी घरकुल द्या म्हणावं. "
अशा प्रकारच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरील, संसारीक रत्नाच्या लग्नाच्या गोष्टी करत होते. बाहेर पावसाची रीपरीप सुरूच होती. मात्र उद्याची वाट पाहत, चिंता करत हे दोघंजनं चुलीजवळ उब घेत बसलेले होते.
दिवस उजाडला. ओलीनं सर्दलेले गोधडे गोळा झाले. आभाळ अजून ढगाळलेलं आणि काळंकुट्टं होतं. त्यामुळं उजाडलेलं जाणवत नव्हतं. तरीही अशा स्थितीत देखील जीवनकर्म सुरू झालं. धोंडीबाच्या घरी आज चूल पेटणार नव्हती. कारण रात्रीच पीठाच्या मडक्यातलं पीठ संपलं होतं आणि पावसामुळं गावचा वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळं चक्की बंद होती. त्यामुळं येलाबाई आपल्या सुनेला म्हणाली,
“आगं ये सुले, बगत काय बसलीस? रत्नी आन् तू जात्यावर कण्या भरडा !'
लगेलगे नणंद-भावजय दोघीजणी जात्यावर गाणे गात बाजरीच्या कण्या भरडू लागल्या. तेवढ्यात श्रीपती गावातून परतला. त्याला मजुरी मिळाली नव्हती. निराश झाल्यामुळं त्याचा चेहरा काळवंडल्यागत झाला होता. त्याला अशा प्रकारे पाहताच धोंडीबा म्हणाला,
"ये ऽ शिरपा, आरं असा उदासून काय बस्लास? काम नाय मिळालं तर नाय, भाकर नाय मिळालीतर भाजीचे मुटके खाता येतेन मर्दा! मातर असा येड्यावानी नाराज व्हवू नकु ना.”
वडीलानं असा धीर देताच शिरपाच्या चेहऱ्यावर आनंदाचे तुषार उधळले. त्याच्या मनाला समाधान वाटलं! सर्वजण सकाळची न्याहरी घेऊ लागले. जेवतावेळी येलाबाई आपल्या नातीला म्हणत होती,
“ये रिंके कण्या पिळून खाऊ नकु ग. त्यानं ताटात पाणी राहतय. जणुकाही बुंदीचा गोळा खाल्यावानी कन्या खात आस्तेत. साळात आसच शिक्वीतेत का?"
जेवतावेळी येलाबाई नेहमीच काही बाही बोलत राहतीया. पुन्हा लगेच म्हणाली,
"ये रत्ने, भगुन्याच्या बुडाची करप मताऱ्याला वाढ. " त्यावेळी धोंडीबा नको म्हणतोय. तरीही त्याला आग्रहानं वाढण्यास सांगतीया.
पावसाची झड तिसऱ्या दिवशी थांबली. सूर्याची कोवळी किरणं धरतीच्या अंगावर खेळू लागली. प्रत्येकाच्या घरात व अंगात साचलेला गारवा झडू लागला. झाडं-वेलीप्रमाणे सर्वांच्या मनात उल्हासाचे नवे अंकुर फुटत होते! मात्र धोंडीबाच्या घरच्यांच्या उल्हासावर पाणी पडलं! 'रत्नाच्या नियोजित सासर गावाहून आमन धमक्या निरोप आला.
'हुंडा वेळेवर पोहचता न केल्यामुळं दिवाळीनंतर होणारी रत्नाची सोयरीक मोडली आहे.'
असं समजताच धोंडीबाच्या घरातले सर्वजण अवाक् झाले. धोंडीबा स्वतःशीच म्हणाला,
"पावण्यानं हे बरं नाय केलं गड्या. दुस्काळात तेरावा महीना. शिरपाला देसमुकाच्या इतं साल धराय लावून हुंडा पवचीती केला आस्ता. मातर पावण्याला दम नाय निगाला गड्या ! "
हुंडा वेळेवर दिला नाही म्हणून रत्नाचं लग्न मोडल्याची खबर ह्या चाळीतून त्या चाळीत वाऱ्यासारखी धडकली! आया-बायाला तर तेवढंच पाहिजे. खो खो हसत येलाबाईच्या घरी पटापटा जमल्या. तिची कीव करू लागल्या. रत्नाला शेजारणीची अशा प्रकारची भलती-सलती कीव म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखंच वाटलं. क्षणाचाही विलंब न करता गावाजवळच्या विहिरीकडं पळाली! तिच्या मागे धोंडीबा, शिरपा व चाळीतले बरेचजण धावले. रत्नानं विचार न करता धाडकन विहिरीत अंग झोकून दिलं! मात्र पुढच्या क्षणीच श्रीपतीनही विहिरीत उडी घेतली. गटांगळ्या खात असलेल्या रत्नाला आटोकाट प्रयत्न करून बाहेर काढलं! तिचा जीव वाचवला. त्यावेळी सर्वांच्या मनाला हायसं वाटलं!
प्रभाकर म्हणाला, “येऽरत्ना, हिरीत जीव द्यायला निगालीस मंग शिरप्याच्या मनगटावर राकी कोण बांदीन? हात येडी."
भानू म्हणत होता, "वा गं वा रत्ने, तुही बाराहाल कमाल हाय. हे काय चांगलं हाय का? आये आपल्या वस्तीत बेड्या पडत्याल की ये."
त्यावेळी हामीद भाईचा महमद म्हणत होता, "ऐसा मत कर रत्ना, जान की बहोत किंमत होती है!” म्हणत तिची समजूत काढत होता.
शेवटी तिला घरी आणलं. तिचे ओले केस कोरडे करताना तिची आई म्हणत होती, “ये रत्ने, हेबग, लगन नाय झालं तर नाय व्हवदी. आसीच कोरी राहा. मातर आसं करू नकाे बग. आगं कायमुन मरायचं? तुला तरणाताठा नवरा नाय मिळाला तर एकादा मतारा-कोतारा, दुसाड का व्हईना जलमात कवातरी मिळनच की. "
आईनं असं समजावल्यामुळं रत्नाला धीर वाटत होता. तिच्या मनात नवी उभारी आल्यागत झालं.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच रिंकी शाळेत जाण्याच्या तयारीत होती. कालच तिनं फाटक्या शर्टला व परकराला जुने ठिगळं जोडून स्वच्छ धुवून घेतले होते. त्यामुळं तिच्या मनात अगदी तरतरी आल्यागत ' झालं होतं. तेल पाणी लावून विंचरलेल्या केसांना फुलांचा गजरा माळल्यामुळं तिच्या रूपात आणखी भर पडली होती. तिच्या अशा प्रकारच्या तयारीला पाहून तिची आजी लगेलगे म्हणाली,
"रिंके, आज साळात नटून-थटून चाल्लीस, काय हाय गं?" "अगं आजी, आज स्वातंत्र्य दिन आहे. “बरं! आन त्यो कसा आस्तुया ?” "अगं आजी आज शाळेत मुले-मुली गुरुजींच्या मदतीनं गावातून प्रभातफेरी काढतात. नंतर मोठे गुरुजी तिरंगी झेंड्याची पूजा करून झेंडा फडकावतात. आम्ही सर्वजण मुले-मुली राष्ट्रगीत म्हणत असतोत. काही मुले आपल्या देशाबद्दल देशभक्तीपर गीत म्हणतात. "
" अगाई! आन् काय नाव हाय आपल्या देशाचं ?' "आजी, आपल्या देशाचं नाव भारत आहे आणि तिरंगी ध्वज हा आपला राष्ट्रध्वज आहे."
"बरंबरं! आन् आपल्या तिरंगी झेंड्याची पूजा करतात म्हणलीस, का गं?"
"होय आजी राष्ट्रध्वज अगदी सर्वाहून श्रेष्ठ आहे." "ये रिंके, मग त्या राष्ट्रध्वजाला मनातल्या मनात म्हण. मया आज्याला साठ वर्ष आन् आजीला पन्नास वर्स झालेत. मातर आतापस्तोर त्यायला अंगावर घालायला सदाबी एकच पटकर आस्तया. त्यांना कपडा मिळुदी म्हणावं! शिरपाला रोज कामधंदा मिळत नाय हे बी सांग आमी दिसाड दोन रोज अर्धपोटी राहतोत. तवा दोन येळला भाकर कुटका मिळुदी म्हणावं. रहायला चांगलं घर नाय मुन बी सांग. रत्नाचं लगीन बिगर हुंडा घेताच व्हवदी म्हणावं. महागाई लैय वाढली सांग. आन् आकरीला तिरंगी झेंड्याला महया दंडवत सांग." मुन बी
त्यावेळी मात्र तिच्या डोळ्यात आर्तस्वरामुळं खूप खूप आनंदाश्रू डबडबले होते. पापण्यावर अगदी भरगच्च ओथंबले होते!
कथाकार - अशोक गायसमुद्रे
***

0 Comments