मराठी कथा नदीच्या पल्याड | Marathi Katha | मराठी कथा - कादंबरी - गोष्टी

 नदीच्या पल्याड

मराठी कथा नदीच्या पल्याड | Marathi Katha | मराठी कथा - कादंबरी - गोष्टी

    मोठी पहाट. नदीकाठचं गारव्याचं झिलान अंगाला काट्यागत बोचणारं. गोधडी अगर चादरीतून तोंड बाहेर ठेवून झोपल्यास डाळींब फुटल्यावानी ओठ चर्रकन उलण्याचा नेम नव्हता. सपासप सपकारे मारत वाहणाऱ्या थंडीत दवबिंदुच्या थेंबाचं झाडावेलींना न्हावू घालणं सुरू होतं. पावसाच्या सरी पडल्यासारखं जनावराच्या पाठीवरून पाणी निथळत होतं.

    अशा तऱ्हेच्या हुडहुडी भरणाऱ्या गारव्यामधी सुमिता आपल्या नवऱ्याला जागे करू लागली. "ये ऽऽ उठा, ये ऽऽ उठा की, पहाट झाली. रानात जायचं नाय का? उठा म्हन्ते ना. मव्हा आण्णा निग्ला वं!”

    रावसाबनं सगळ्या अंगाला आळोखे-पिळोखे दिले. काल बैलासारखं राबराब राबल्यामुळं त्याचं अंग ठणकत होतं. त्यातच मुलखाची थंडी पडल्यामुळं त्याला आणखीच कंटाळा आला होता. हुंबत हुंबत म्हणाला, “सुमे दिवस उगवू दे, मंग जातो."! बराच वेळ झाला तरी जावई जागा होत नाही हे पाहून त्याची सासू कमलबाईला भलताच ताव चढला! तिच्या तळपायाची मुंगी मस्तकाला भिडली. नसीचे ठसके देत तिनं दारात येऊन तोंडाचा पट्टा सुरू केला,

    "आगं ये सुमे, का गं? रावसाब कामुन जागं व्हत न्हाईत? आगं उठ म्हणावं, तुव्हा आण्णा ताटकळत उभं हाईत. "

    कमलबाईला थोडच फाईजी. घरात आसं काही झालं की लगेच तिच्या तोंडात ॲटमबॉंम फुटाय लागलेत. लगेलगे भल्या पहाटच कचाकचा बोलत जावयाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत बसली. गोफण गुंड्या सारखं रिंग-रिंग भिरकावत तिच्या शब्दांचे गोळं उडू लागले!

   "काम कटाळेपणा... खायला काय व्हतय...'' आसा हाय... तसा हाय. फलानं-बिस्तानं म्हणत बराच वेळ कोकी सारखं क्याव- क्याव करू लागली.

    फटफट उजाडलं. रावसाब जागी झाला, परंतु त्याला कुणी बोलेना. अण्णासंगं भल्या पहाटच कामाला जायचं व्हतं असं बायकोचं नि सासुचं म्हणणं होतं. त्यामुळं त्या सरासरा आपापल्या कामाला भिडल्या होत्या. जावयाचा सकाळी उठण्याचा तोरा पाहून पुन्हा एकदा कमलबाई भलतीच खवळली! पाची बोटं एका जागी करून हातवारे करत म्हणाली, "जग घरजावई कशाला करतंय ? सासू- सासऱ्याची आन् त्यायच्या इस्टेटीची काळजी घ्येयाला. हाता-धोतानं काम करून सासरवाडीच्या सगळ्यांचा संबाळ कराया. आन महया घरी उल्टं झालंय. आमालाच जावयाची मनधरणी करून त्येलाच संबाळायची येळ आलीया. या बयाऽऽ ही बरी गत नाय गं !”

    कमलबाई जावयाला कडाकडा बोलतीय असं पाहताच शेजारच्या कौसा, सखु, शालु, गजरा पटापटा घरी आल्या. मैत्रिणी घरी आलेल्या पाहताच सुमिताला स्फुरण चढलं. ती ही चेकाळली. तावातावानं आई सोबत नवऱ्याचे काही-बाही बोलून लचके तोडू लागली. पोरीसोरीत खसखस पिकली. काळी ठिक्कार गजरा कौतुकानं म्हणाली, “नकर काम केलं फाईजी वं भावजी. सासऱ्याची इस्टॅट कवातरी तुमचीच व्हणार हाय!"

    नेहमी करता रावसाबचं काम फक्त ऐकून घ्यायचं आन् सोडून द्यायचं. शेजारणी बोलल्यामुळं यावेळी मातर त्याला भलताच राग आला. कोणाला एक शब्द ही न बोलता तडक रानाकडं जाऊ लागला. त्यावेळी कौसा हसतच म्हणाली, "कमलबाई जावयाची गाडी लायनीवर आली बग. तरातरा रानाकडं चाल्लेत."

    "आगं न्हाई यीवून काय खाईल ? आमची खानदान लै खनखन हाय. पुरल्यालं खंदून काडीन हाँ !"

    रावसाब रानाकडं जात होता. त्याचे शिनपाक पोरं त्याच्या फजितीला हसत होते. तर अनुभवाचे कटू क्षण त्याच्या मनात अनेक विचारांचे मोहोळ उठवत होते. गाव... आई ... शिक्षण... परंतु नाईलाज त्याचे सगळे विचार गिळून पचवत होते! 'मी ही माणूसच ना. पण एवढा गरीब कसा काय झालो?' म्हणत स्वतःवर रागराग करू लागला. एकाएकी त्याला सगळ्या सृष्टीचाच राग आला. झाडं, वेली, पाखरं याची घृणा वाटू लागली. रंगीबेरंगी फुलांना चुरगाळत चालताना झपाझप पावलं आदळत होता.

    रानात गेला. सासरा कटाळ्यासारखा एकटाच रागंरागं काम करत होता. त्याला चोरट्यासारखं वाटत असतानाच त्याला त्याच्या वडीलाची आठवण झाली. बाप अकाली सोडून गेल्यामुळं त्याच्यावर अशी वेळ आली होती. पण घरजावई होण्याच्या परिस्थितीला तो स्वतः नि सुमिता जबाबदार होती.

    आण्णा रागाला प्रेमाची झालर देत म्हणाले, "झ्याक झालं. न्याहरी-गीरी केली का नाय ?" रावसाबनं मानेनं नाही म्हटलं. "आँ ऽ का हो? येईल सुमिता न्याहरी घिवून." लगेलगे दोघंजण कामात भिडल्या गेले. ऊसाचे वाफे पाण्यानं भरत होते. त्यावेळी रावसाबला आईची आठवण झाली.

    त्याची आई कोंडाबाई करारी स्वभावाची बाई. 'मला खोटं खपनार नाय, नेकी कवाबी कामी येतीया!' म्हणत वागणारी. सगळ्या चाळीत तिचा एकटीचा वेगळाच तोरा होता. कामधंद्यात तेवढीच सरस. सगळ्याच बाबतीत तिचा न्याराच दरारा होता. तरुणपणात नवऱ्यासंगं मेलेलं ढोर ओढलेलं आणि नवऱ्याच्या मिशा उपटलेल्या कुणीही सांगतंय. मिशाचं कारण होतं नवरा ताडी पिऊन खोटं बोलल्याचं! पण मुलगा घरजावई झाल्यापासून तिचा तोरा भलताच मावळून गेलाय.

    कोणी तिच्याजवळ, 'रावसा बैलावानी राबत आसन.... कुत्र्यावानी कामाची वड आसन... ' असं म्हणताच तिच्या काळजात आग पडतीया. जणु काही वाघीणीची शेळी झाली होती. गावात कुणाच्या घरी दळण-भरडण करून पोट भरतीया.

    दुपार झाली. रावसाब भुकेनं कासावीस झाला तसी सुमिता न्याहरी दुपारी एकदाच घेऊन आली. जेवण केल्यामुळं त्याला तरतरी आल्यागत झालं. पुन्हा तेच काम... घाण्याच्या बैलासारखं!

    सायंकाळी रावसाब आपल्या बायकोला प्रेमानं म्हणत होता. "सुमे, मी म्हणतोय आपण येत्या पौर्णिमेला गावाकडं जाऊ. मायची लैय सय येतेय. भेटीला या मुन तिचा सांगावा आलाय आपल्याला.'

    "ईऽऽ बया, नकु ग माय, घर सोडून आंगणं परदेशी. आन् आपून तिकडं गेल्यावर आण्णाची लैय फासाटी व्हतीया. ऊस सुकन की."

    "अगं लौकर येऊ. दोन-तीन दिवसातच. "नगं बाई मी नाय येत. तुमी जावा खुशाल." रावसाबनं विचार करून एकट्यानं जायचं ठरवलं. गुलाबी रात्र गारव्यातल्या सळसळीनं रसरसली खरी, पण सकाळीच कमलबाईचा तोंडाचा बंबं पुन्हा धडाधडा पेटला!

    "व्हय वं रावसाब, सुमी सांगत व्हती, तुम्ही म्हणं गावाकडं चाल्लात!”

    "हो, आंबेडकर नगरात पौर्णिमा साजरी करतात. कार्यक्रम आणि आईची भेट घेऊन येतो. "

    “म्हंजी तुमी मनाचे मालक झालात. आन् सुमिताला कोण संबाळीन ?"

    "तुम्ही हाईत की !”

    “आता गं बाईs, आमी कायमुन संभाळावं? ती तुमची बायकु हाय. तिला तुमच्यासंग घेऊन जा."

    "परंतु ती माझ्यासोबत यायचं नको म्हणतेय."

    "ते जमनार नाय बायकु जसं म्हणीन तसं तुमाला आयकाव लागन, गावाकडं जायचं रहित करा. इतं कामाची लैय टिप्परघाई हाय. आमची पाचावर धारण करू नका. सांगून ठेवते !"

    सासूनं रावसाबच्या समोर भलतच कुंपण घातलं. बिचारा, इकडं आड तिकडं विहिर झाल्यागत त्याची अवस्था झाली. त्याच्या नजरेत आई, त्याचे मित्र, कार्यक्रम अगदी जशाच्या तसं दिसत होतं.

    दुसऱ्या दिवशी पत्र आलं. 'आई आजारी हाय. रावसाबनं लवकर निघून यावं.' पत्र वाचताच तो खळकन पाझरला. डोळे टचटचले. आता मात्र कसल्याही अडचणी बाजूला ठेवून त्याला गावाकडं जावं लागणार होतं. सासू-सासरे या प्रसंगी देखील आपणाला गराडा घालतील, जाऊ देणार नाहीत. असं त्याच्या लक्षात आलं.

    पुढच्या क्षणीच अनेक दिवसापासूनचं तुंबलेलं पाणी मोकळं केल्या बरोबर खळखळून उसळतं, त्याप्रमाणे तो उसळला. जणू काही विरोधी पक्षासारखं त्याच्या अंगात अचानक बळ संचारल्यागत रागानं डोकं भडकलं!

    पत्नीला अगदी आवेशानं रागातच म्हणाला, "सुमितेऽऽ, लवकर पिशवी भर, आपल्याला आईकडं जायचंय!” सुमिताला अचानक धस्स झालं. बैलाचा वाघ कसा झाला हे तिला कळेना. भलतीच चकित झाली. कारण तो प्रथमच एवढ्यानं गर्जला होता. त्याचं तिळपापड होणं मनातल्या आत्मविश्वासाचं होतं. सुमिता देखील तेवढ्याच त्वेषानं ओरडली. “मी नाय वं येत, जावा तुमी.”

    "येत न्हाईस का?" म्हणाला नि काठीच्या एका फटकाऱ्यातच धाडकन तिला आडवं पाडलं ! सुमिता मोठ-मोठ्यानं ओरडत, विव्हळत रडू लागली. कमलबाई भलतीच द्रवली,

    "आतारय बाबा, मही लेक मरण की ऽऽ, केवढ्यानं मारलं गं बया!”रावसाबला पुन्हा स्फुरण चढलं. सासूबाईला वाघावानी चवताळून म्हणाला, “बाजूला व्हा मामी, नायतर तुमचं डोकं फुटल !”

    निखाऱ्या सारखं लाल तंबुर झालेल्या रावसाबला कमलबाईनं पाहिलं कि तिला दरारून घामच फुटला! धाडकन बाजूला झपाटल्यागत ओरडत पडली,

    "मेलीऽऽ मही सुमिती मेलीऽ वाचवा.” शेजारच्या शेजारणी विजेगत सरसावल्या. तोबा-तोबा करत धास्तावल्या. तळमळीनं चिंगी म्हणत होती, "राव्हद्या वं भावजी. मारू नका. सुमिती मरण वं!" तरीही रावसाब चापट बुक्क्यानं दणादण दणके देत होता.

    "बोल, आईकडं येतीस का न्हाई?"

    “येते वं! तुमी म्हन्ताल तसं आयकते.” "पिशवी भर लवकर." "भरते वं, पर मारू नका."

    कमलबाई भलतीच घायकुतीला आली. "आवं रावसा मारू नका वं, मी धाडते तुमा दोघाला. तुमचा सासरा रानातून आला म्हंजी लगेलगे पाठवते वं. थोडा धीर धरा. "

    कमलबाई भलतीच लोण्यावानी मऊ झाली होती. तिचा झणझणीतपणा पार रसातळाला गेला. अधून-मधून पदरानं डोळं कोरडं करणं सुरूच होतं. शेजारणी लबालबा कमलबाईची बाजू घेऊन तडतडत होत्या. दोन हात लाकुड चार हात ढलपी काढत होत्या. परंतु त्यांच्या बोलण्याकडं रावसाब जरासं देखील लक्ष देत नव्हता. तोच सुमिता घरातून हुंदत-फुंदत, धापा टाकत हातात पिशवी घेऊन सासरी जाण्यासाठी निघाली. तिला अशा अवस्थेत पाहताच तिच्या मैत्रिणी अगदी गोऱ्या- मोऱ्या झाल्या! कारण त्या नेहमी म्हणत,

    “सुमिते, तुव्हा भ्रतार म्हंजी नुसता चाकर हाय बघ ... विचारा गरीब गायीसारखा हाय गं... तुह्या मुठीत हाय!" असा तसा म्हणत असत. परंतु त्या गोष्टीची सांजवेळ झाली होती. त्यांना सुमिताकडं पाहून हसावं की रडावं असं झालं होतं.

    शेवटी त्या दोघांना भांडण किजवे करत निरोप दिला. नदीच्या पल्याड दूर-दूर जाईपर्यंत त्यांना कमलबाई व जमलेले सगळेजण टक लावून पाहत होते. त्यावेळी सुमिताच्या मैत्रिणीमध्ये पुन्हा एकदा भलतीच खसखस पिकली होती!


कथाकार - अशोक गायसमुद्रे

***

पुढे वाचा>>>

Post a Comment

0 Comments