मराठी कथा परीक्षा | मराठी गोष्टी | Marathi Story | Marathi Katha

 परीक्षा


    मार्च महिना. वार्षिक परीक्षा सुरू झाल्यामुळं कॉलेजातल्या मुली-मुलं परीक्षेत भलतेच गर्क झालेत. तालुक्याला शिकणारे खेड्या पाड्यातले मुलं मिळेल त्या वाहनानं प्रवास करून येऊन परीक्षा द्यायलेत. रायपूर पाटीवर सुपर बसगाडीला थांबा नाही त्यामुळं प्रवासासाठी एखादं वाहन मिळालं की तालुक्याला जाणाऱ्या लोकांना जणू काही आभाळच ठेंगणं होतंय.

    "त्यायला उतरू द्या... आरं पुढं चला" म्हणत ढकला ढकली करत बाया-माणसं प्रवास करतेत.

    दीक्षाला जीप मोटार मिळाल्यामुळं तिला दुधात साखर पडल्यावानीच वाटलं! आता वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर होताईल मुन तिच्या मनातलं हास्य चेहऱ्यावर खळकन झळकलं. रिंग-रिंग करत जीप मळ्याजवळच्या वळणावर धावत आली नि एकाएकी मोठ्यानं घडघड वाजलं ! लगेलगे ड्रायव्हरनं गाडी गपकन कडेला उभी करून चाकाकडं बघीतलं, चाक पम्चर व्हवून भुईला टेकलं होतं. ड्रायव्हरनं ‘चाक बदलावं लागेल' म्हणताच गाडीतल्या तालुक्याला जाणाऱ्या आया-बाया कडाकडा बोंट मोडाय लागल्या.

    “ह्या गावाला एस.टी. उभी ऱ्हात नाय आन् जीप गाड्याची तर आसीच बोंब हाय. आता कवा पवचावं कामावर ?"

    दीक्षा तर भलतीच घाबरली. तिचा आज शेवटचा पेपर आहे. उशीर झाला तर पेपर सोडवण्यासाठी वेळ कमी पडेल म्हणून तिनं लहान लेकरावानी त्या जीप ड्रायव्हरला अडचण सांगितली बिचारा कळवळला. दुसऱ्या गाडीत बसवून देतो म्हणाला परंतु वेळेवर कोणतीच गाडी येईना! 

थोड्या वेळानं एक मोटरसायकलस्वार येताना ड्रायव्हरनं पाहिला नि त्याला घाबऱ्या घुबऱ्या हातानं 'गाडी उभी करा' असा इशारा करताच सर्रकन त्यानं गाडी उभी केली. तो जवळच्या आनंदगावचा बलभीम होता. दीक्षाची आणि त्याची चांगली तोंड वळख आहे. कधी- मधी येता जाताना बघीतलेलं. गाडीत बसलेल्या सगळ्यानं दीक्षाची अडचण त्याला सांगताच म्हणाला,

    "चला, नेऊन सोडतो तिथं, परीक्षेचं कामंय." दीक्षानं 'आव पाहिला ना ताव !' कचकन मागं बसली. वाऱ्यावर तरंगल्यासारखं बलभीम गाडी पळवीत होता. तेंव्हा मातर तिच्या काळजात धस्स झालं. 'कुठं नेईल का? गाडीवर कोणी बघीतलं तर लोकं काय म्हणतील? नाकात वारं शिरल्यावानी' जे नाय ते तिच्या मनात येत होतं. पण बलभीम चांगल्या स्वभावाचं आणि बऱ्याघरचं एकुलतं एक पोरगं हाय. तो कधीच घरच्या धनदौलतीचा टेंभा मिरवीत नाय. कॉलेज शिकत घरची शेती वाडी करतोय. बाप रिटायर कारकून. त्यांना पेन्शनचा रगड पैसा मिळालाय. बलभीमच्या वडीलांनी तालुक्याला राहुन आतापर्यंत नोकरी केली. पण आता जन्मगावी नवं घर बांधून बापलेक शेती करतेत. कांही वेळातच तिला बलभीमनं सुरक्षितपणे कॉलेजच्या जवळ आणून सोडलं. दीक्षाचा आनंद गगनात मावेना.

    “फार उपकार झाले हो तुमचे !”

    “त्यात उपकार कसले? सहज इकडं येत होतो म्हणून आणलं. बरं चलतो मी."

    इतकंच म्हणाला नि तावडीतून सुटल्यावानी भर्रऽकन निघून गेला. दीक्षा थोडावेळ त्याच्याकडं बघत होती. लगेलगे ती आत्मविश्वासानं परीक्षेला हजर झाली.

    खरं तर बलभीमचा स्वभाव तिला मागच्या वेळीच आवडला होता. म्हणूनच ती त्याच्या गाडीवर बसून आली होती. एकदा ती कॉलेज करून गावाकडं येण्यासाठी बसमध्ये बसली होती. बलभीम ही त्याच गाडीत खिडकीच्या कडेला पेपर वाचत बसलेला. तेवढ्यात त्याच्या गावचा सुधाकर धोतर सावरत दुडकं चालत त्याच्या जवळ आला.

    "मंग कसा हाईस बलभीमा"

    "बरा हाई सुधाआण्णा, काय कामंय?"

    "आरं भलतच आडचनीचं काम पडलय. मान्सं दवाखान्यात

आडमीट हाईत. आन् डाक्टरानं तर पैसा आणा मुन सांगलय. जवळचे व्हते तेवढे खर्च झाले. गावाकडच येत व्हतो. पण बरं झालं तुझी भेट झाली. "

    बलभीमनं चौकशी करून सुधाआण्णाला रूपये दिले! त्यावेळी त्याच्या डोळ्यात लैय आसवं तरळले होते.

    “आरं वा रं वाघा. माणुसकीला बापाच्या म्होरी एक पाऊल पुढं गेलास. तुझा बाप बी आसाच आडल्या-नडल्याची नड भागवित आलाय. तुझे भलतेच उपकार झाले बघ मह्यावर !”

    सुधाण्णा भलताच भावनाविवश झाला होता. दीक्षानं त्यावेळी हे सगळं पाहिलं होतं आणि आज बलभीमनं तिला ऐनवेळी मदत केली होती. जणूकाही त्याच्या स्वभावाची प्रचितीच आली होती. तिची परीक्षा संपली. शेवटचा पेपरही तिनं चांगला सोडवला होता.

    त्यामुळे भलत्याच आनंदात गावाकडं पोहचली. दीक्षा घरी येताच शेजारच्या आया-बाया तिच्याकडं टुकूटुकू वाकड्या नजरेनं बघत होत्या. त्यांना अगोदरच हरब्यानं सगळं सांगितलंय. दूध विकून सायकलनं गावाकडं परत येताना त्यानं दीक्षाला मोटरसायकलवर बसलेलं बघीतलं होतं! त्यावेळी शेजारची नात्यागोत्यातली कौतीका म्हणाली, " झाली का गं दिक्षे तुही परीक्षा ?"

    दीक्षा हसतच म्हणाली, "झाली हो वैनी, पेपरही चांगले सोडवलेत मी."

    “अगाई! आन् परीक्षेला मोट्रीनं गेल्तीस का सरं कशानं ?” "वैनी, मी मोटरसायकलवर बसून गेले होते हो.'

    दीक्षानं सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. मात्र खरं बोललेलं कौतीकाला चांगलंच झोंबलं. म्हणाली, "तरण्या ताठ्या पोरीनं आसं कुणाबी संगं नाय माय जावा !" कौतीकानं असं म्हणताच कालींदाबाई तावातावानं म्हणाली,

    "फटफटीवर बसून मही ल्येक गेली त गेली. मोटर बिगडली मुन तिनं नापास व्हावं काय? वरीस वाया गेलं म्हंजी? आगं कुटवर घिवून बसायचाय असा खुळचटपणा?" काही-बाही बोलत समजावत जणू काही त्या घर डोक्यावर घेत होत्या!

    दीक्षा परीक्षेतून आल्याची खबर तिच्या मैत्रिणी मंजुळा, राही, राजसी यांना समजली. पटापटा तिच्या जवळ आल्या. त्या गावात सातवी पर्यंतच शाळा शिकल्यात. तिला थट्टेनं खोदूखोदू विचारत होत्या.

    “ये दीक्षे, त्यो तुला काय म्हणाला व्हता ग...? त्याला खेटून बसली व्हतीस का गं, टाटा केल्तास का गं?"

    त्याचं नाव विचारताना त्यांची हसण्याची पोळी पिकत होती. दिक्षाला गप्प राहून कसं चालंल, तीही त्यांच्यासंगं हसायची. 'नाही गं' आणि 'चल हाट' असं म्हणत ती सगळं हसण्यावर नेत होती.

    तिकडं मैना जीजीचा सुरेश दीक्षाच्या मोटरसायकल प्रकरणामुळं टकरीत हारलेल्या बैलावानीच चिडलाय. दीक्षाला जीजीनं त्याच्यासाठी कालींदाबाई जवळ मागणं घातलं होतं. त्यावेळी नुसतं 'देउ-बघू' इतकच बोलणं झालेलं. तेवढ्यामुळेच सुरेश तिच्यावर लक्ष ठेवतोय. तिनं कुणाला बोलू अगर हासू नैय असं त्याला वाटतंय. त्यामुळं सगळेजण खदाखदा हसत त्याची टिंगल करत्येत.

    दुसऱ्या दिवशी मैनाजीजी जणुकाही वाघीनीवानी चवताळून कालींदाबाईच्या घरी आली. दीक्षानं कुणाच्या तरी गाडीवर बसून जाऊन परीक्षा दिलीय, असं कळल्यापासून तिच्या नाकाला जणू काही मिर्च्या झोंबल्यात! बिड्या ओढू ओढू ती लैय खंगलीया. परंतु तिच्या अंगी ताठा भलताच आहे म्हणाली,

    “कालींदे आयकिलस का, जुन्या जमान्यात बायका नवऱ्याचे पाय धुवून प्यायच्या आन् पराया गड्याकडं बग्नं तर काय, त्याच्या म्होरून जाता येत नव्हतं. आतं तुह्या लेकीचं आसं वाग्नं कसं पटून घ्यावं बरं? पुन्हा जर ती आसी वाग्ली तर सून म्हणून कोण करीन ग?

असं ऐकताच कालींदाबाई रागानं भलतीच सनकली.

“जीजे, आता मह्या लेकीला धुतलेल्या तांदळा सारखी मोकळीक हाय. म्हणूनच मी तिला कॉलेज शिकवायलेय. झाला गेला त्यो जमाना. आता नव्या जमान्यात तिला मी कसलच बंधन घालणार नाय. तिनं हसावं, खेळावं, लैय शिक्षण घ्यावं. यातच आमचं समाधान हाय बग."

    मैनाजीजी रागंरागं नाक मुरडून तिथून तरातरा घरी आली. मात्रं तिचं बोललेलं बाबारावला पायातल्या कुरुपावानी ठणकलं. लगेलगे उठले. रानात जायचं रहित करून तालुक्याला काम हाय म्हणत झपाझप पावलं टाकत निघाले. भाऊला संगे घेतलं आणि पाटीवर येऊन त्यांनी तडक आनंदगाव गाठलं.

    भाऊला घेऊन आण्णा कुठं गेले म्हणून दीक्षा आणि तिची आई भलतीच चिंता करायल्या. 'तालुक्याला काय काम हाय का?' असं म्हणत शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारत होत्या. त्यांना जेवावं वाटेना. गायीच्या लहान्या वासरावानी त्या बाबारावची वाट बघत होत्या.

    संध्याकाळ झाली. दीक्षाचे वडील आणि चुलते आमनधपक्याच घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू मावत नव्हतं. पुनवेच्या चांदण्यावानी त्यांना आनंद झाला होता. त्यांना आलेलं पाहताच दीक्षाच्या मैत्रिणी पटापटा घरी आल्या. तोंडात मध विरघळल्यावानी बाबाराव म्हणाले, "आपल्या बारकीचं लगन जमलं!

लगेलगे कालींदाबाईनं विचारले,

“या बया, आन पावने कोण, कुटले?"

"नेटातलेच हाईत. आनंदगावचे. काल त्यांनी म्हणं तिला सिक्शनाच्या परीक्षेला पवचती केल्तं. पुडच्या हप्त्यात जलमभराच्या परीक्षेसाठी तिला हाळदीला नेणार हाईत.' "

    असं ऐकताच दीक्षाच्या मैत्रिणी आणि तिची आई खदाखदा हसायला लागल्या.

    "वाटंवर गुड्डीच्या नव्हतं ध्यानीमनी आनू बापानं केला घरधनी. " म्हणत जमलेल्या आया-बाया तिची टवाळी करत कौतुकानं हसत होत्या. त्यावेळी दीक्षाला सागराचं पाणी जणूकाही चैत्यभूमी जवळ आल्यावानीच वाटलं! तिच्या मनाजोगं झाल्यामुळं तिला हर्षोल्हासाचं भरतं आलं होतं!

पुढे वाचा>>>

कथाकार - अशोक गायसमुद्रे

***

Post a Comment

0 Comments